शबनम न्युज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांना टिळक स्मारक ट्रस्ट कडून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा सुरू झाला आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसह शरद पवारही उपस्थित आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जागतिक नेते म्हणून नावलौकिक मिळवलेले पंतप्रधान मोदी यांची निवड केल्याबद्दल टिळक स्मारक ट्रस्टचे मी आभार व्यक्त करतो. तसेच यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक देशांनी सन्मानित केले. मोदींनी जागतिक स्तरातुन आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानी आणली आहे. जगभरातील महत्त्वाचे नेते पंतप्रधान मोदींकडे विश्वासाने पाहतात, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक यांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. तसेच या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे भाग्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आज लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त मी अभिवादन करतो, तसेच लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडणे हीच खरी आदरांजली ठरेल, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.