शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलिसांकडून 48 तासात चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकूण 4 लाख 39 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 3 चैन चोरी, दोन घरफोडी, दोन चोरीचे असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहे.
राहुल रमेश चव्हाण (वय 24, रा. भारत माता नगर, दिघी पुणे) व करण सिंह सुरजित सिंग भादा (वय 20, रा. दिघी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै 2023 रोजी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नटीस चपाती सेंटर, सखुबाई गार्डन जवळ, गौरी नगर, भोसरी पुणे या ठिकाणी मोटरसायकल वरून आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी करून घेऊन गेले होते. त्यानंतर थोड्याच वेळात भोसरी परिसरामध्ये आणखी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते.
सदर घटनेमध्ये चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल व अंगात काळे रेनकोट परिधान करून तोंड रुमालाने झाकून ओळख लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. एकाच वेळी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन चेन चोरीच्या गंभीर घटना घटल्या होत्या. या घटनेचा तपास भोसरी पोलीस करीत होते. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली असता, भोसरी पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 4 लाख 39 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान सदर गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोरे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार राकेश भोईने, हेमंत खरात, नवनाथ पोटे, सागर जाधव, सचिन सातपुते, प्रभाकर खाडे, तुषार वराडे, आशिष गोपी, स्वामी नरवडे ,महिला अंमलदार प्रतिभा मुळे, सुषमा पाटील, भाग्यश्री जमदाडे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.