शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
“देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, आमदार मनीषा कायंदे, आमदार आशिष शेलार, आमदार यामिनी जाधव, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महात्मा गांधींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा अगणीत हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप आपण ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने करत आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या मंत्राचा जागर आजच्या काळात आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.