गणेशोत्सवात महापालिकेकडून मंडप, स्टेज, कमानीचे परवाना शुल्क माफ..
पिंपरी :- माजी उपमहापौर शैलजाताई अविनाश मोरे व सिंधूनगर युवक मित्र मंडळ कार्याध्यक्ष श्री अरुण थोरात यांच्या मागणीस यश आले असून, पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ या कालावधीसाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात उभारणी केलेले मंडप/स्टेज, कमान यांचे परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला असून तसा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत गणेश मंडळांना मंडप भाडे आकारण्यात येऊ नये, असा निर्णय झाला होता. ठाणे महापालिकेत या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याची अंमलबजावणी कार्यक्षेत्रात केली नव्हती. याबाबत माजी उपमहापौर शैलजाताई मोरे व सिंधूनगर युवक मित्र मंडळ कार्याध्यक्ष श्री अरुण थोरात यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मंडप शुल्क रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल महापालिकेचे त्यांनी आभार मानले आहेत.
याबाबत शैलजाताई मोरे यांनी गणेशोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठे परिश्रम घेत असतात. हा सार्वजनिक महोत्सव असल्यामूळे त्यासाठी कोणतेही शुल्क मंडळांकडून घेऊ नये अशी मी मागणी केली होती. त्याबाबत महापालिकेने सकारात्मक निर्णय घेतला आहे. तसा आदेश आयुक्तांनी काढला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सन २०२२ ते सन २०२६ या कालावधीकरिता गणेश उत्सव, नवरात्र उत्सव व सार्वजनिक धार्मिक कार्यवाहीसाठी सार्वजनिक मंडळे यांना मंडप, स्टेज, स्वागत कमान इ. साठी परवानगी देण्याबाबत परिपत्रक निर्गत करण्यात आले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशात्सव २०२३ साठी पालिकेच्या जागेवर मंडप/स्टेज व कमानीसाठी परवाना शुल्क चालू आर्थिक वर्ष सन २०२३ करिता माफ करण्यास मान्यता दिली असून, सन २०२३ सालाकरिता वसुल करण्यात आलेल्या शुल्काची संपुर्ण रक्कम संबंधित मंडळांना परत करण्यात यावी, असे आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.