पिंपरी, दि. ६ सप्टेंबर २०२३:- महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना सन २०२३ – २४ साठी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे, बालभारती यांच्याकडून थेट पद्धतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शिका पुस्तके खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथील पाणीपुरवठा व स्थापत्य विषय देखभाल दुरुस्ती करणे व अनुषंगाने कामे करणेबाबत येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मधील पिंपळे सौदागर येथे मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता विविध ठिकाणी मंडप व्यवस्था पुरवणे व इतर अनुषंगिक कामे करण्यास, तसेच पिंपळे सौदागर परिसरात आरोग्य विषयक कामांसाठी मशिनरी पुरविण्यास, तसेच बी. एम. एक्स पार्क उभारण्यास मान्यता देण्यात आली.
मनपाच्या प्रभाग क्रमांक २५ येथील वाकड परिसरात व ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे व चर एम. पी. एम , हॉट मिक्स व कोल्ड मिक्स पद्धतीने दुरुस्ती करणे तसेच महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढणे कामकाजास मुदतवाढ देणे बाबत मान्यता देण्यात आली.
महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील समाज मंदिरांमध्ये अभ्यासिका “नवी दिशा-सर्वांगीण विकासाची” सुरू करणे, निगडी देहूरोड मिलिटरी स्टेशन ५० हजार वृक्षारोपण करणे व दोन वर्ष देखभाल काम वनविकास महामंडळाकडे सोपवणे बाबत तसेच प्रभाग क्र. १० मधील औद्योगिक परिसरातील रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार करण्यास, प्रभाग क्र. ११ मधील कुदळवाडी व इतर परिसरात पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता जलवाहिनी टाकने व इतर अनुषंगिक कामे करणेबाबत तसेच प्रभाग क्र. २६ मधील वाकड पिंपळे निलख प्रभागातील इतर परिसरात फुटपाथ व पेव्हींग ब्लॉकची देखभाल दुरुस्ती विषयक कामे करण्याबाबत मान्यता देण्यात आली.
मुख्य अग्निशमन अधिकारी – वर्ग १ यांना नव्याने देण्याच्या वित्तीय अधिकार प्रदान करणेबाबत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत वाहन चालक कर्मचारी नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.३ डुडूळगाव येथील गट क्रमांक१८९ मोशी- आळंदी रस्ता १८ मीटर डी.पी रस्ता विकसित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २७ गाव मौजे रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तीन रखवालदारांचे मदतनीस नियुक्ती करणेबाबत येणाऱ्या खर्चास तसेच प्रभाग क्र. १० मधील शिव शाहू शंभो उद्यान व इतर स्थापत्य विषयक कामे करणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ११ मधील स्वामी समर्थ क्रीडांगण परिसरात रायफल शूटिंगसाठी स्थापत्य विषयक कामे करण्यास तसेच शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यात व त्या कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.