शबनम न्यूज | पिंपरी
तब्बल ५२५ वर्षांची परंपरा लाभलेली, चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीची भाद्रपद पालखी यात्रा येत्या शनिवारपासून (दि. १६) सुरू होत आहे. २५ सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज दरमहा श्री मयूरेश्वराच्या दर्शनास मोरगाव येथे जात असत. त्यांनी सन १५६१ साली चिंचवड येथे पवना नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली. श्री मोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११४ व्या वर्षी सन १४८९ मध्ये श्री मयुरेश्वराची तांदळामूर्ती श्री क्षेत्र मोरगाव येथील कन्हा नदीच्या पात्रात, गणेशकुंडात प्राप्त झाली. वार्धक्यामुळे श्री मोरया गोसावी महाराज हे दरमहा मोरगाव येथे न जाता त्यांना प्राप्त झालेली तांदळामूर्ती घेऊन भाद्रपद व माघ महिन्यात मोरगाव येथे जात असत. भाद्रपद महिन्यात श्रीमंगलमूर्ती पालखीतून मोरगाव येथे नेण्याची ही परंपरा सुमारे गेली ५२५ वर्षा पेक्षा अधिक काळ अविरत चालू आहे.
पालखी प्रस्थानाच्या निमित्त मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अश्व अग्रभागी असतील. तसेच पुण्यातील नामवंत श्रीगजलक्ष्मी ढोल पथक सहभागी होणार आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता पालखी श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान करणार आहे. श्री मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवडगाव स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी-चिंचवड लिंकरोड) मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मीरस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल.
रविवारी (दि. १७) पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान ठेवेल. कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून क-हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल, पालखी सोमवारी (दि.१८) सकाळी मंदिरातून शिवरी रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल.
त्यानंतर मंगळवार (१९ सप्टेंबर) आणि बुधवारी (२० सप्टेंबर) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. २१ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री क-हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम वडकी या ठिकाणी मुक्काम करीत २५ सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंदिरात येईल.