शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी, 24 सप्टेंबर 2023: आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लागले असून यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. मॅजिक फिगर १४५ हा आकडा असतो. तो गाठल्याशिवाय कुणी मुख्यमंत्री होत नाही. केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं. अजित पवार हे आज दिवसभर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते ४० गणपती मंडळाच्या आरती आणि काही उद्घाटने होणार आहेत.
आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील उर्से टोलनाका या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. यावर अजित पवार यांनी बोलताना म्हटलं, मुख्यमंत्री व्हायचं कोण शिल्लकच राहणार नाही, सर्वजण आपापले फ्लेक्स लावत आहेत. माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना पाठीमागे सांगितल होतं की असे फ्लेक्स लावून काही उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळतं. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर १४५ चा आकडा आहे तोच मुख्यमंत्री होतो अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहते.