शबनम न्युज | नंदुबार
राज्यातील कुठल्याही आदिवासी भागात नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते आज नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ष 2023-24 च्या नवीन विद्यार्थ्यांच्या तुकडीसाठी आयोजित स्वागत समारंभात संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी,शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील बहुविध प्रकारचे रुग्ण,आजार आणि आरोग्य क्षेत्रातील खरी आव्हाने आदिवासी दुर्गम भागात पहावयास मिळतात. अशा ठिकाणी आपल्या करिअरची सुरूवात नवोदित डॉक्टरांनी केल्यास त्यांच्या भविष्यातील वाटतालीस हा दुर्गम भागातील अनुभव पाथ फाईंडर ठरू शकतो. शैक्षणिक कालखंडात जे शिकता येत नाही, जे शिकवले जात नाही असे वैविध्यपूर्ण व आजार आणि रुग्णांवर उपचार करण्याचे कृतीशील शिक्षण या भागात मनापासून काम करणाऱ्या डॉक्टरांना मिळत असते. तसेच नवोदित डॉक्टरांच्या सोबत अनुभवी डॉक्टरांनी आपली सेवा दिल्यास जुन्यांचा अनुभव आणि नव्यांच्या ज्ञानातुन प्रभावी उपचारांची एक नवी साखळी आदिवासी, दुर्गम भागात आरोग्याच्या क्षेत्रात निर्माण होवू शकते व त्यातून या भागातील आरोग्याच्या प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी मदत होवू शकते. नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यकर्तृत्वाचा सांधा बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.