शबनम न्युज | वाकड
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी केलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला असून. त्यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन हौदातून जवळपास ३५०० मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन व्हावे, जल प्रदूषण रोखले जावे आणि गणेश मूर्तीची विटंबना रोखली जावी या मुख्य उद्देशाने श्री विशाल वाकडकर यांनी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटाची निर्मिती केली होती. मागील पाच वर्षांपासून ते सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. या वर्षी गणेशोत्सवात दहा दिवसांत जवळपास साडेतीन हजार मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले आहे. येथील मूर्तींचे श्री फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत संकलन करून दरवर्षी गणपती दान ही योजना राबविली जाते व यातून येणारा निधी हा अनाथ मुलांच्या संगोपनासाठी तसेच शैक्षणिक खर्चासाठी वापरला जातो.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या अनोख्या उपक्रमाला भेट देऊन माहिती जाणून घेतली होती. तसेच विशाल वाकडकर यांचे कौतुक केले होते. वाकड आणि परिसरातील गणेश भक्तांनी या विसर्जन घाटामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. या ठिकाणी गणेश भक्तांसाठी अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
आगामी काळातही पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांना आणखी प्रोत्साहित करण्यात येईल असे विशाल वाकडकर यांनी सांगितले.