शबनम न्युज | पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नामांकित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अमृत महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील, माजी विद्यार्थी संघाचे संचालक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी त्यांच्या गावी शिक्षणाचे रोपटे लावून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य केले आहे. कृत्रिम अवयव तयार करून लोकांच्या जीवनात संजीवनी निर्माण करण्यासाठी झटणारे डॉ. के. एच. संचेती आणि पुणे शहरात नृत्य प्रशिक्षणाच्या २५ संस्था स्थापन करणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे या सर्वच सत्कारमूर्तीनी समाजात आपला ठसा उमटविला आहे, असे श्री.पाटील म्हणाले.