शबनम न्यूज | मुंबई
लोअर परळ पुलावरील दक्षिणवाहिनी बेकायदेशीररित्या वाहतुकीसाठी खुली केल्याप्रकरणी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेडकर आणि 15 ते 20 अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली, त्यानुसार शनिवारी पहाटे या प्रकरणी आदित्य ठाकरेंसह या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ना.म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे लोअर परळ आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोणाचा प्रश्न जटिल बनला होता.
या पुलावरील दक्षिण वाहिण्याचे काम पूर्ण होत आले असून, पथदिवे, मार्गीका आखणी, रंगकाम आदि कामेही लवकरच पूर्ण करून हा पूल तीन-चार दिवसात वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस होता. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी पुलावरील दक्षिण वाहिनीवरील रस्ता रोधक हटवून नारळ फोडून ती वाहतुकीसाठी खुली झाल्याचे जाहीर केले. काम अंतिम टप्प्यात आले असताना, सदर पूल वाहतुकीसाठी खुल्या केल्या प्रकरणी या सर्वांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.