शबनम न्युज | मुंबई
जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुरुदेव श्री श्री रवीशंकर उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.
जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल.
कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल.