शबनम न्युज | नाशिक
जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
आज निफाड तालुक्यातील मौजे रौळस, पिंपरी आणि कसबे सुकेणे या गावांत मंत्री अनिल पाटील यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमंगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, गट विकास अधिकारी महेश पाटील,तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, संजय सुर्यवंशी, कृषी सहाय्यक अमोल सोमवंशी, योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री अनिल पाटील यांनी मौजे रौळस, पिंपरी आणि कसबे सुकेणे या तिनही गावांत प्रत्यक्ष भेट देवून नुकसानीची पाहणी करत बाधित शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी बोलतांना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, शेतपीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल पाहता नाशिक जिल्ह्यात जवळपास 33 ते 34 हजार हेक्टरवर शेतपीकांचे नुकसान झाले असून निफाड तालुक्यात जवळपास 10 ते 12 हजार हेक्टर क्षेत्र नुकसानीखाली आहे. यात द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतावर जाऊन पंचनमान्याचा जो अंतिम वस्तूनिष्ठ अहवाल तयार होईल तो मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये,
तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर भरीव प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी बाधित शेतकऱ्यांना दिले.