शबनम न्युज | पिंपरी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंद्रायणी स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत ‘रिव्हर सायक्लोथॉन- २०२३’ चे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे हे आपले ६ वे वर्ष आहे. “आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित न करता स्वच्छ ठेवावी. या संकल्पनेवर भर दिला आहे. तसेच, गतवर्षी या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला असून, प्रतिवर्षी मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता यावर्षी आपण सायकल बद्दलचे Longest line of bicycles (static) हे रेकॉर्ड, गिनीस वर्ल्ड रेकॉड्स मध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सदर रेकॉर्ड शनिवार, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात येईल. तसेच, रिव्हर सायक्लोथॉन रॅली ही रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मुख्यत्वे तीन विभागात होणार आहे. पाच किलोमीटर, १५ किलोमीटर आणि २५ किलोमीटर असे हे विभाग आहेत. या रॅलीसाठी २५ हजारपेक्षा जास्त सायकलिस्ट येतील असा अंदाज आहे, असा दावा आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी रिव्हर सायक्लोथॉनचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे आणि सचिन लांडगे, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. आनंद पिसे, सचिन मरगज, सायकल मित्र पुणेचे बापू शिंदे, संतोष गाढवे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बापू गायकवाड, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बापू बांगर, वाहतूक विभागाचे श्री. साळुंखे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डसब चे भारतातील फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थातर्फे डब्ल्युटीई इन्फ्रा चे विवेक जोशी, आयआयबीचे अॅड. लोहारे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे प्रेसिडेंट विवेक येवले, लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्डचे प्रेसिडेंट डॉ. गायकवाड उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस करणार सारथ्यः
यावर्षींचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रॅलीचे सारथ्य पिंपरी-चिंचवडच्या पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच, पोलीस विभागाकडून लोकांनी रहदारीचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहनसुद्धा या रॅलीद्वारे करणार आहेत. प्रत्येक आठवड्याचा सोमवार हा ‘हॉर्न फ्री’ म्हणजेच हॉर्न न वाजवता कसा घालवता येईल म्हणजेच ध्वनी प्रदूषण सुद्धा टाळता येईल आणि प्रत्येक आठवड्याचा बुधवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जावा म्हणजे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व आरोग्य सुधारेल याचा प्रयत्न करण्याचे आवाहन पोलीस विभाग करणार आहे.
अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेश दादा स्पोर्ट्स फ्फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड नगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही कार्यक्रमांची माहिती व इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान याबद्दलची माहिती पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व शाळा आणि हाउसिंग सोसायटी यांना भेट देऊन दिलेली आहे, असेही आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन माननीय श्री शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), श्री विनय कुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) व माननीय आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.