शबनम न्यूज | पुणे
”गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून, सातत्यपूर्ण आर्थिक धोरणामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी महत्वाचे केंद्र ठरत आहे. गुंतवणूक, पतधोरण आणि औद्योगिक विस्तारासाठी पोषक वातावरण देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासात भर घालत आहे. यामध्ये सनदी लेखापाल (सीए) व मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) यांचे योगदान मोलाचे आहे,” असे प्रतिपादन ‘आयसीएआय’च्या कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेसचे (सीएमआयबी) अध्यक्ष सीए दुर्गेश काबरा यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी) आणि आयसीएआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मुख्य वित्तीय अधिकारी संवादसत्रात (सीएफओ मीट) काबरा बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या सत्रात डीएसपी म्युच्युअल फंडचे प्रॉडक्ट अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट साहिल कपूर, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी, तसेच आयसीएआय पुणेचे सचिव सीए अजिंक्य रणदिवे, खजिनदार सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारणी सदस्य सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत, सीए काशिनाथ पठारे व सीए मोशमी शहा उपस्थित होते.
सीए दुर्गेश काबरा म्हणाले, “उद्योगांना सावरण्यासाठी सनदी लेखापाल महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. आयसीएआय नेहमीच सीए, उद्योग आणि संबंधित सर्व भागीदारांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. सीए, सीएफओचे काम हे पांडवांप्रमाणे आहे. एकनिष्ठ, सक्षम कार्यशैली, ध्येयासक्त, समर्पित भावना, प्रामाणिकपणा व कामातील सचोटी तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.”
साहिल कपूर म्हणाले, “चीन, अमेरिका, जपान आणि जर्मनी या देशांपाठोपाठ भारत आर्थिक प्रगती करत आहे. पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी, नवीन उद्योग, स्टार्टअप, वेगवेगळ्या क्षेत्रात होणारी गुंतवणूक यामुळे भारत महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे. उद्योगात वरिष्ठ पदांवर काम करताना आर्थिक ताळेबंद चांगला राहील, यावर मेहनत घ्यावी. केवळ सीएफओपर्यंत पोहोचण्याचे ध्येय असू नये.”
सीए राजेश अग्रवाल म्हणाले, “सनदी लेखापाल, उद्योगातील अधिकारी, सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय साधण्यासाठी आयसीएआय पुणे सदैव तत्पर असते. आर्थिक परिस्थिती, ताळेबंद आणि अर्थव्यवस्था सक्षम राहावी, यासाठी वेळावेळी मार्गदर्शन सत्रे आयोजिली जात आहेत.”
यावेळी ‘सीएफओ समोरील आव्हाने व संधी’ यावर झालेल्या चर्चासत्रात सीए (डॉ.) शिवाजीराव झावरे, सीए संदीप देशपांडे, सीए देवेंद्र मिश्रा, सीए विनेश कृपलानी यांनी विचार मांडले. सीए मौशमी शहा यांनी सूत्रसंचालन, सीए अमृता कुलकर्णी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए अजिंक्य रणदिवे यांनी आभार मानले.