शबनम न्युज | पुणे
“गुरुकुल परंपरा ही आपल्या देशाचा वारसा आहे. ही परंपरा विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे, तर संस्कारही देते. देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे माध्यम म्हणून प्राचीन संहिता गुरुकुलाकडे पाहायला हवे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन कर्तव्य हाच आपला धर्म मानणाऱ्या आयुर्वेदाचार्यांचा प्रशासनात सहभाग वाढला, तर अनेक सामाजिक सुधारणा होतील,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
प्राचीन संहिता गुरुकलाच्या वतीने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘ई-गुरुकुल’ ऍप्लिकेशनचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सौरभ राव यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, प्राचीन संहिता गुरुकुलाचे संस्थापक वैद्य हरीश पाटणकर, डॉ. स्नेहल पाटणकर, नानासाहेब पाटणकर, पंकज पाटणकर यांच्यासह गुरुकुलातील विद्यार्थी उपस्थित होते.
गुरुकुलातर्फे देण्यात येणारा ‘गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’ वैद्य पुष्कर नाचणे, वैद्य केतकी चौधरी, वैद्य स्नेहल कीर्तने व वैद्य आदित्य दुधे या विद्यार्थ्यांना सौरभ राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयुष्य जगण्यास उपयुक्त अशा वैद्य हरीश पाटणकर यांच्या सहजसोप्या सिद्धांतांच्या दैनंदिनीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पद्मज प्रकाशनतर्फे पंकज पाटणकर यांनी हे प्रकाशित केले आहे.
आयुर्वेदामध्ये काही व्यक्ती व काळविशिष्ट बदल करून आयुर्वेदाला विकसित करण्याची गरज आहे. हेम्पसारखी वनस्पती आयुर्वेदामध्ये वापरली जाते, ज्याचे व्यवसाय मूल्य ५००० कोटीचे आहे. त्या वनस्पतीच्या संशोधनासाठी कृषी विज्ञान केंद्र पुढाकार घेऊन कार्य करत असल्याचे राजेंद्र पवार यांनी नमूद केले.
वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, “प्राचीन संहिता गुरुकुलाच्या या ऍपद्वारे आयुर्वेदाच्या विदयार्थ्यांना शैक्षणिक लाभ होणार आहे. यामध्ये व्याख्याने, लाईव्ह क्लासचा समावेश आहे. गुरुकुलासारखे उपक्रम सर्व मुलांमध्ये रुजवून त्यातून शिक्षण पद्धतीत अभिनव उपक्रम राबवण्याचा मानस आहे. भारतासह जगभरातील आयुर्वेदाचे विद्यार्थी, आयुर्वेद प्रेमीना या ऍपचा चांगला उपयोग होईल.”
सूत्रसंचालन वैद्य विवेक आंबरे यांनी केले. आभार पंकज पाटणकर यांनी मानले.