शबनम न्युज | मुंबई
भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच, नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राजभवन येथे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यांद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आयोजित सन 2023-24 या वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडिंगचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, जीओसी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन, एअर ऑफिसर कमांडिंग मुख्यालय मरीन एअर ऑपरेशन्सचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यावेळी उपस्थित होते.
शासकीय, खासगी नामवंत व्यक्ती आणि संस्थांचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनंदन करुन गेल्या वर्षी सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगामी वर्षातही यापेक्षा अधिक उत्कृष्ठ ध्वज दिन निधी संकलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय सैन्य हे त्यांच्या त्याग, आणि शौर्यामुळे ओळखले जाते. भारतीय सैन्यदल हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, ज्यामध्ये आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हटंले आहे. आपल्या मातृभूमिला आणि आपल्या जनतेला सैनिक अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात. त्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि आपले राष्ट्र प्रगती करू शकतो. जम्मू आणि काश्मीर, डोकलाम, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील बंडखोरीचा मुकाबला करण्यातही आपले सैन्य अत्यंत उत्कृष्ट काम करत आहे अशा सैनिकांच्या या योगदानासाठी आपण सदैव ऋणी असले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.