शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी महापौर तथा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे 30 डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
दोन दिवसापूर्वीच संजोग वाघेरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पिंपरी चिंचवड शहरात राजकीय वातावरण तापले. त्यानंतर संजोग वाघेरे यांनी समाज माध्यमांद्वारे आपण 30 डिसेम्बर तारखेला शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे. 30 डिसेम्बर रोजी मुंबई येथे होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात संजोग वाघेरे शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मावळ लोकसभा मतदारसंघा करिता उमेदवारी मिळणे संजोग वाघेरे यांना सोपे होणार आहे, असे बोलले जात आहे.
मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजोग वाघेरे तीव्र इच्छुक होते. त्यानुसार त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू केली होती. परंतु ऐनवेळी अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने संजोग वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.