शबनम न्युज | पिंपरी
अवयव दान करण्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असून सामान्य नागरिकांचे अवयव दानासंबंधी प्रबोधन करत त्यांना अवयव दान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या रोटरी क्लबचे कॅलेंडर देखील लोकांचे प्रबोधन करेल, असे मत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी पुणे यांच्या २०२४ वार्षिक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांच्या हस्ते मोरवाडी, पिंपरी येथील हॉटेल घरोंदा हॉटेल येथे पार पडला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी, झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डीनेशन कमिटीच्या समन्वयक आरती गोखले, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष यतीश भट, सचिव सचिन वादबुधे, प्रकल्पाचे समन्वयक जसविंदर सिंग सोखी, राजेश अगरवाल, वसंत ग्रुपचे पारेख यांच्यासह रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि आकुर्डी शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि आकुर्डी यांच्या 2024 सालच्या वार्षिक दिनदर्शिकेची “अवयव दान जनजागृती” ही थीम आहे.
आरती गोखले म्हणाल्या, आपल्या भरतची लोकसंख्या १३० कोटीच्या वर आहे, मात्र वर्षभरात अवयव दान करणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या आत आहे. त्यामुळे आपल्याला अवयव दान करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजगृती करणे आवश्यक आहे. दान करण्यात आलेले अवयव तातडीने गरजवंतांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. ग्रीन कॉरीडोरमुळे अवयव वेळेत पोहोचण्यासाठी मदत होते.