आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ३० व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी समारंभाचे आयोजन
पुणे : दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ३० व्या स्थापना दिनानिमित्त दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांना, तर यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार एआयटीच्या २००२ बॅचचे माजी विद्यार्थी अंकुश तिवारी यांना जाहीर झाला आहे.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडंट लेफ्ट. जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते सोमवार, दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता, दिघी येथील एआयटीच्या कॅम्पसमध्ये या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट यांनी दिली.
या सोहळ्यात महाविद्यालयातील ‘उत्कृष्ट विद्यार्थी’, प्रत्येक शाखेतील उत्कृष्ट विद्यार्थिनी, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट शिक्षक, सर्वोत्तम इनोव्हेशन आदी पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असेही ब्रिगेडियर भट यांनी नमूद केले.
१९९४ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल बी.सी. जोशी, पीव्हीएसएम एव्हीएसएम, एडीसी यांच्या काळात झाली. संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी या तीन अभियांत्रिकी शाखांसह सुरु झालेल्या ‘एआयटी’मध्ये माहिती तंत्रज्ञान शाखेची भर पडली असून, प्रत्येकी १२० विद्यार्थी क्षमता आहे. २०२३ पासून मास्टर ऑफ इंजिनियरिंग (डेटा सायन्स) अभ्यासक्रम सुरू केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ‘एआयटी’च्या सर्व शाखा ‘एनबीए’ मान्यताप्राप्त असून, ‘नॅक’ श्रेणीप्राप्त आहे.
‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट्ट यांच्या नेतृत्वाखाली, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यदलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन सुविधा प्रदान केले जात आहे. उत्कृष्टता, प्रामाणिकता, सचोटी, सांघिक कार्य, सातत्यपूर्ण शिक्षण आणि नाविन्य यासारख्या मूलभूत मूल्यांवर ‘एआयटी’ भर देते. ‘एआयटी’चा पर्यावरणपूरक कॅम्पस ३० एकरमध्ये व्यापलेला आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, इनोव्हेशन व अन्य अवांतर उपक्रमांसाठी विविध क्लब येथे आहेत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांशी ‘एआयटी’ संलग्नित असून, प्लेसमेंट्च्या बाबतीत सक्षम आहे. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, गुगल, ड्रीमप्लग टेक्नॉलॉजीज अशा अनेक कंपन्यामध्ये विद्यार्थी कार्यरत आहेत. सर्वाधिक एक कोटी बारा लाखाचे पॅकेज ‘एआयटी’च्या विद्यार्थ्याला मिळालेले असून, गेल्या तीन वर्षात प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वेतन १४ लाख रुपये आहे. अनेक विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्स, उद्योग सुरु केले आहेत, असे ब्रिगेडियर भट यांनी नमूद केले.