शबनम न्युज | पिंपरी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागातर्फे चार चाकी वाहनांना काळी काच लावणाऱ्यांविरोधात 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान, विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत एकूण 3435 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 37 लाख 91 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.
चार चाकी वाहनांना काळी काच लावणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येणार असून, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे. चार चाकी वाहनांना काळी काच लावू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेतर्फे यापूर्वी करण्यात आले आहे. मात्र, तरीही ज्या वाहनास काळी काच लावण्यात येणार त्या वाहन चालकाकडून दंड वसूल करण्यात येईल, असेही वाहतूक विभागाने म्हटले आहे. तरी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून त्यांच्यावर होणारी दंडात्मक तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.