शबनम न्यूज | पुणे
विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यापीठांनी शैक्षणिक कॅलेंडर तयार करून ते जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यापीठांनी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदवीच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
यूजीसी चे सचिव प्रा. महेश जोशी यांनी देशातील विद्यापीठे, कॉलेज तसेच उच्च शिक्षण संस्थांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करणे, परीक्षा, सुट्ट्या, सत्राचा शेवटचा दिवस आदींबाबत शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक तयार केले पाहिजे.
युजीसीच्या नियमावलीचा संदर्भ देत विद्यापीठांनी त्यांचे शैक्षणिक कॅलेंडर तयार करावे, त्यामध्ये व्यावसायिक कोर्सेस वगळता इतर अभ्यासक्रमाचे वर्ग ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर पदवीच्या द्वितीय वर्षाचे वर्ग जास्तीत जास्त जुलै महिन्यांच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू करावेत तसेच पदवी वर्गाचे निकाल जूनच्या अखेरच्या आठवड्या पर्यंत जाहीर करावेत, असे नमूद केले आहे. यासह व्यावसायिक अभ्यासक्रम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यासाठी दोन आठवडे कालावधीची शिथिलता देण्यात आली आहे.