शबनम न्युज | पुणे
पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य कसे असावे, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्व फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे आयोजन भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते मनोजजी एरंडे, डॉ. दीपकजी माने, शैलेशजी टिळक, विलासजीकथुरे, डॉ. पी. जी. धनवे यांनी या कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. यावेळी शैलेशजी टिळक यांनी सर्व खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिल्याबद्दल महायुती उमेदवार म्हणून मोहोळ यांना खेळाडूंनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. सर्व खेळाडूंच्या वतीने ऑलिंपियन मनोजजी पिंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो, असा माझा विश्वास असून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ हे आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातही विविध क्रीडा प्रकारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी रेखा भिडे, अंजली भागवत, शांताराम जाधव, डॉ. दीपक माने या मान्यवर खेळाडूंनीही मनोगत व्यक्त केले. अरविंद पटवर्धन यांनी आभार मानले.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात पार पडलेल्या या कॉन्क्लेव्हसाठी ३२ विविध प्रकारच्या खेळांतील नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. त्यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त नेमबाज अंजली भागवत, ऑलिंपियन मनोज पिंगळे, रेखा भिडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, गौरव नाटेकर, संदीप किर्तने, श्रीरंग इनामदार, एस. द्रविड, ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजित कुंटे, नितीन किर्तने, २०११ चे मिस्टर युनिव्हर्स किताब विजेते महेश हगवणे, जीवनगौरव पुरस्कारप्राप्त रमेश विपट, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विकी बांकर यांच्यासह १६५ छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा समावेश होता.