कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
– पालिकेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी एकजूट महत्वाची
पिंपरी (प्रतिनिधी) –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील काही पदाधिकारी हाताला धरून ते फितुर झाल्याचे चित्र विरोधक उभे करत आहेत. पक्षांतर्गत वाद व अविश्वास त्यांच्याकडून निर्माण केला जात आहे. त्यानंतर विरोधक आपली बाजु पलटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तोंडावर पाडण्याचे काम करत आहेत. विरोधकांच्या या षडयंत्राला बळी न पडता व त्यांच्या भूलथापांना भीक न घालता काम करण्याचे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना केले आहे. महापालिकेत विजय मिळवुन विरोधकांना धुळ चारणार असल्याचा इशारा लांडे यांनी दिला.
लांडे म्हणाले की, आगामी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकजुट दाखविणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे व युवा नेते पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या विजयात वाटा उचलु असे आवाहन लांडे यांनी केले. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. महाविकास आघाडीतील शहरातील मित्र पक्षाला देखिल विश्वासात घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत काम करू, असे देखील आवाहन या वेळी लांडे यांनी केले.
महापालिका निवडणुका समोर असताना आजपर्यंत झालेल्या चुका दूर करून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम आपण हाती घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे व युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आणायची आहे. त्यासाठी सर्वांची एकजुट महत्वाची असून कार्यकर्त्यांनी समाजात घडवून आणलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. त्या अनुशंगाने राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडून पक्ष बांधणीला सुरूवात झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी प्रदेश पातळीवरील नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पदाधिका-यांना सूचना दिल्या आहेत. मात्र विरोधक समाजामध्ये पक्षाविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला राष्ट्रवादीच्याच काही पदाधिका-याकडून पुष्टी मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचू नये, यासाठी आपण प्रयत्न करू, असे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.
विलास लांडे म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी विरोधकांकडून पक्षात तेढ निर्माण केली जात आहे. पक्षातील काही पदाधिका-यांशी सलोखा साधून कार्यकर्त्यांमध्ये अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निस्सिम विश्वास असलेला कार्यकर्ता पक्षापासून कदापी दुरावला जाणार नाही. त्यामुळे समाजात निर्माण केल्या जाणा-या भूलथापांना बळी न पडता प्रत्येकाने पक्षवाढीसाठी सचोटीने प्रयत्न करावेत. जुन्या-नव्यांची मोठ बांधून आपल्याला महापालिकेवर राष्ट्रावादीची एकहाती सत्ता आणायची आहे, असे आवाहन लांडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
कार्यकर्ता म्हणून प्रत्येकावर जबाबदारी
शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे. पंधरा वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्ता करताना शहरातील समान्य नागरिकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. नागरिकांचा विश्वास जपून शहरात सोयी सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला आहे. तसेच, अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प राबविले. आरोग्य, शिक्षण, क्रिडा, कला, सांस्कृतीक अशा अनेक क्षेत्रात राष्ट्रवादीचे योगदान आहे. विकासाची एवढी मोठी परंपरा असताना कोणी बाष्फळ बडबड करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता त्याला भीक घालणार नाही, अशा शब्दांत लांडे यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत चीतपट केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा लांडे यांनी दिला.