शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड (दि.१५ नोव्हेंबर ) -: 14 नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघ व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने थेरगाव च्या कबड्डीच्या मैदानावर श्रीमती शकुंतला ताई खटावकर (कबड्डी अर्जुन पुरस्कारार्थी) यांचे ‘कबड्डी काल आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्याने बालदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ग प्रभागाचे अध्यक्ष, नगरसेवक अभिषेक बारणे, यांच्या शुभहस्ते शकुंतलाताई खटावकर, मंदार दीक्षित (स्पोर्ट्स इंडी), कालिदास उर्फ बापू लांडगे (कुस्ती मार्गदर्शक) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा शिक्षक आठवे बी.जी. यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन खटावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी खटावकर यांनी आपल्या व्याख्यानात म्हंटले की, बदलत जात असलेल्या कबड्डी खेळाचे स्वरूप स्पष्ट करत कबड्डी हा खेळ मोठा आणि श्रीमंत होत असल्याचे सांगत त्याने ऑलिम्पिकचा दरवाजा ठोठावला तर नवल वाटायला नको हे स्पष्ट केले. पूर्वी कब्बडी खेळाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक होता. त्यातच महिला आणि मुलींनी कबड्डी खेळणे अत्यंत दुरापास्त होते. अशा कठीण परिस्थितीत मी कबड्डी खेळायला सुरुवात केली. आजही कबड्डी खेळ खेळते व शिकवते कबड्डीने मला अर्जुन पुरस्कार दिला. गरवारे कंपनीमध्ये मला कबड्डी मुळे नोकरी मिळाली. थेरगावातील कबड्डी मुली ओलंपिक कबड्डी खेळताना पाहायला मला आवडेल. असे कबड्डी खेळाचे महत्त्व सांगत त्यांनी थेरगावातील खेळाडूंचे कौतुक केले.
राष्ट्रीय खेळाडू मनीषा राठोड, भूमिका गोरे, रूपाली डोंगरे, श्रावणी सावंत व अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा याप्रसंगी शकुंतला ताई खटावकर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तेजल महाजन, पूजा फरांदे, निकिता माळी, श्रेया जेधे, विद्या गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व अमृता भागवत यांनी आभार मानले.