शबनम न्यूज , प्रतिनिधी :
गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील पवना नदीकाठी गणपती विसर्जन घाट आहे, या घाटावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्र काटे यांनी महानगरपालिकेच्या ड प्रभाग प्रशासनाकडे केली आहे.
गणेशोत्सव काहीच दिवसानंतर सुरू होत आहे या गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. आपल्या परिसरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे, बैठी घरे, आणि सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने पवना नदीकाठी असलेल्या विसर्जन घाटावर गणपती विसर्जन करावयास येत असतात, या काळात कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे असे शत्रुघ्न काटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील प्रत्येक विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी गणपती आरती करण्याची व्यवस्था करणे, घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निग्रणी ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, घाटावर आवश्यक अशी विद्युत दिवे लावणे, गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदाची रंगरंगोटी करून स्वच्छ व नीटनेटकी करणे, अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास एक रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विसर्जन घाटावर नियमितपणे एक बचाव पथक नियुक्त करणे ,जेणेकरून विसर्जन दरम्यान होणारे जीवघेणे अपघात टाळता येतील. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी शत्रुघ्र काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.