शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.११ डिसेंबर) :- महाराष्ट्र राज्यातील सर्वच निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याचे वक्तव्य मागील काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी केले होते, या वक्तव्यानंतर महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी टिकणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता, त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक जवळ आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे शहाबुद्दीन शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, मा.नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार व केलेल्या आदेशानुसार महानगरपालिका ते केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते शक्तिशाली होणे गरजेचे आहे, सामान्य व तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्यास आवश्यक आहे, तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी त्यांच्या सभेत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी काँग्रेससोबत महानगरपालिका निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट केले आहे.
स्वबळावर लढण्याचा तसा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी घेतलेला आहे व त्यानुसार आगामी होणाऱ्या २०२२ ची महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी ही देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे.