गजाला सय्यद
शबनम न्यूज : मुंबई (दि.१६ डिसेंबर) :- उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील. अशी माहिती महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल. असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षांचा तपशील जारी करण्यात आला आहे.
तसेच इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. असे ही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती ही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.