ओपन जिम साहित्य पडले धूळखात
यमुनानगर परिसरातील अनेक खेळाडूंचे नुकसान
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगर परिसरातील प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रीडा संकुल येथील स्केटिंग रिंग मैदानावर या परिसरातील अनेक विद्यार्थी स्केटिंग खेळाचा सराव नियमित मागील पाच ते सहा वर्षांपासून करीत आले आहेत. परंतु २०२० पासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यमुना नगर येथील हे मैदान सरावासाठी बंद करण्यात आले त्यामुळे अनेक इच्छुक खेळाडूंना आपला सरावही बंद करावा लागला. यानंतर २०२१ मध्येही पहिल्या लॉकडाऊन नंतर च्या काळात परिस्थिती नियंत्रणात असताना स्केटिंग खेळाचा सराव पुन्हा एकदा या मैदानावर सुरू करण्यात आला. परंतु कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी परत एकदा या मैदानाचा उपयोग प्रशासन वतीने करण्यात आल्याने या स्केटिंग खेळाचा सराव विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव बंद करण्यात आला.
सरावाला अडथळे निर्माण होत असल्याने त्यांना योग्य प्रकारे सराव करता आला नाही यानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन वतीने परत एकदा लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली. त्यानंतर काळात परिस्थिती परत एकदा नियंत्रणात आल्याने या मैदानावर विद्यार्थ्यांना सराव करण्यास पूर्णपणे मोकळीक मिळेल, अशी आशा होती. परंतु महानगरपालिकेच्या भांडार विभागाच्यावतीने तसेच क्रीडा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे या मैदानावर खेळाडूंना आपला सराव करता आला नाही महानगरपालिकेच्या भांडार विभागाच्या वतीने तसेच क्रीडा विभाग यांच्या वतीने या मैदानावर ओपन जिम चे साहित्य मागील सात ते आठ महिन्यापासून टाकण्यात आले आहे व आता ही सदर जिमचे साहित्य त्याच ठिकाणी पडून आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून सदर साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. परंतु या ओपन जिम साहित्याचा कुठेही उपयोग करण्यात आला नाही आणि या साहित्याचे अशाप्रकारे या मैदानात ठेवल्याने या स्केटिंग खेळातील खेळाडूंना येथे सराव करता आला नाही. मध्यंतरी या स्केटिंग खेळाच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये येथील खेळाडूंना सहभाग घेता आला नाही अशी अनेक खेळाडू आहेत की जे या खेळात प्राविण्य मिळवून शहर पातळी, राज्य पातळी तसेच देशपातळीवर या खेळाचे चांगल्याप्रकारे प्रदर्शन करण्यास सक्षम झाले असते. परंतु महानगरपालिकेच्या क्रीडा समिती विभागाच्या तसेच भांडार विभागाच्या गलथान कारभारामुळे या विद्यार्थ्यांना ,खेळाडूंना आपली खेळाची क्षमता, प्राविण्य या स्पर्धांमध्ये दाखविता आले नाही की या स्पर्धेत त्यांना सहभाग हि घेता आला नाही. याबाबत या विद्यार्थी, खेळाडूंच्या पालकांनी तसेच या खेळाडूंनी महानगरपालिकेचे या परिसरातील नगरसेवक जे महानगरपालिकेत क्रीडा समिती सभापती पदावर असतानाही त्यांनी या खेळाडूंच्या समस्येकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडेही या खेळाडूंनी वारंवार विनंती केली, वारंवार निवेदने दिली परंतु त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांच्या या दुर्लक्ष पणा मुळेच खेळाडूंचे अतोनात नुकसान झाले असल्याची खंत सदर खेळाडू व त्यांच्या पालकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे ही सदर खेळाडू व त्यांचे पालक हे निवेदनाद्वारे आपली समस्या मांडणार आहेत. खरे पाहता ओपन जिम चे साहित्य ठेवण्यासाठी या मैदानाचा उपयोग करणे हे पूर्णतः चुकीचे आहे एकतर कोट्यावधी रुपये खर्च करून हे साहित्य खरेदी करण्यात आले त्याचा कोणताही उपयोग करण्यात आला नाही व हे साहित्य ज्या मैदानावर ठेवण्यात आले त्या मैदानावर जे खेळाडू सराव करीत होते त्या खेळाडूंना सराव करता आला नाही त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन तसेच क्रीडा समिती व भांडार विभागाच्यावतीने खेळाडू, नागरिक तसेच महानगरपालिकेचे न भरून येणारे नुकसान करण्यात आले असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा समिती व भांडार विभागाच्या हलगर्जीपणामुळे यमुनानगर परिसरातील अनेक खेळाडूंचे नुकसान
ओपन जिम साहित्य पडले धूळखात pic.twitter.com/xCshomFdjX
— SHABNAM NEWS (@ShabnamNews) March 5, 2022
Advertisement
पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्यासाठी हे ओपन जिम चे साहित्य महानगरपालिकेतर्फे खरेदी करण्यात येणार आहे . त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली परंतु या निविदा प्रक्रियेत ही अनेक आरोप यावेळी महानगरपालिकेवर करण्यात आले होते. क्रीडा विभागातर्फे शहरातील उद्याने, पदपथ व इतर ठिकाणी सुमारे तीन कोटींची ओपन जिमचे साहित्य उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भांडार विभागाने निविदा प्रक्रिया राबविली. एकूण १९ निविदा आल्या आहेत . त्यासाठी आठ पुरवठादार तांत्रिक बाबतीत पात्र ठरले . त्यांच्याकडून प्रत्येक साहित्याचे एक याप्रमाणे विविध १३ प्रकारचे नमुने मागविण्यात आले एकूण सात पुरवठा धारकांनी येथे सर्व नमुने मुदतीमध्ये निगडीतील दुर्गा माता मंदिरातील हॉलमध्ये जमा केले परंतु, या साहित्याची तपासणी योग्यप्रकारे करण्यात आली नाही.
साहित्याचे पॅकिंग न काढताच तपासणी अहवाल सादर करण्यात आला होता. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु आता हे साहित्य या प्रबोधनकार केशवराव ठाकरे क्रीडा संकुल येथील स्केटिंग रिंग मैदानात धूळ खात पडले आहेत. त्याचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नाही. तसेच या परिसरातील खेळाडूंना कोणताही सराव या मैदानावर करता न आल्याने अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या परिसरातील विद्यमान नगरसेवक हे महानगरपालिका क्रीडा समितीचे सभापती आहेत. त्यांनी या खेळाडूंना प्रोत्साहन देणे अपेक्षित होते, या खेळाडूंच्या समस्या जाणून घेणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही या परिसरातील अनेक खेळाडू स्केटिंग या खेळात प्राविण्य मिळवणारे होते, पदक मिळविणारे होते, परंतु महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळे या खेळाडूंना आपल्या खेळात पदक मिळविता आले नाही. यास जबाबदार कोण? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.