पै आयटी ऑलिंपियाड आणि नॅशनल एज्युकेटर पुरस्कारांचे वितरण
विद्यार्थ्यांना ग्लोबल करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या गुरूजींचा सन्मान !
शबनम न्यूज : पुणे (दि.२३ मार्च ) :- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए .इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पै आयटी ऑलिंपियाड ‘ स्पर्धांचा पारितोषिक वितरण 23 मार्च रोजी दुपारी आझम कॅम्पस मधील असेंब्ली हॉल मध्ये झाला.
याच कार्यक्रमात पै आयटी नॅशनल एज्युकेटर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.या उपक्रमाचे हे तपपूर्ती वर्ष होते.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे अध्यक्षस्थानी होते.संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख, डॉ. ऋषी आचार्य, अंजुम काजळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषदांमध्ये माहिती तंत्रज्ञान शिकविणाऱ्या उमेश खोसे,मृणाल गंजाळे , अॅड.नागनाथ विभुते,प्रकाश चव्हाण,शफी शेख,आनंदा अनेमवाड यांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा पै नॅशनल आय.टी. एज्युकेटर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.एकूण १५ लाखांची पारितोषिके या समारंभात दिली गेली. त्यात लॅपटॉप,नोटबुक,आय पॅड,मोबाईल संच,हॅंडीकॅम,टेलिस्कोप,सन्मा नचिन्ह ,प्रशस्तीपत्र यांचा समावेश होता.
डॉ.ऋषी आचार्य यांनी प्रास्ताविक केले. ‘या वर्षी ऑलिंपियाड मध्ये ६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. संगणक, माहिती तंत्रज्ञान विषयक प्रश्न सोडविण्याची ही ऑनलाईन स्पर्धा होती. बारा वर्षात ५ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला ‘, अशी माहिती त्यांनी दिली.
*जिल्हा परिषद विद्यार्थी झाले ग्लोबल !*
जिल्हा परिषद शाळातील या शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानासंबंधी अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केले. नागनाथ विभुते यांनी ‘लर्निंग विथ अलेक्सा ‘ उपक्रम केला होता. शफी शेख यांनी ‘ मित्र ‘ अॅप द्वारे अध्ययन सोपे केले. तसेच
प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. मृणाल गंजाळे यांनी ‘ पपेट इन एज्युकेशन ‘ उपक्रम अद्यापनात केला. आनंदा अनेमवाड यांनी स्वतःच्या पहिल्या पगारातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी लॅपटॉप घेतला. प्रकाश चव्हाण यांनी यू ट्यूब साधनांनी विद्यार्थ्यांना शिकवले. उमेश खोसे यांनी बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाने अवगत केले.या सर्व शिक्षकांनी कंपन्याच्या सीएसआर फंडातून शाळांना संगणक विषयक उपकरणे मिळवून दिली. अॅप तयार केले. स्काईपद्वारे परदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
*भावी काळातील शिक्षणाचे चित्र दिसले : आयुष प्रसाद*
आयुष प्रसाद म्हणाले, ‘ पुणे जिल्हा परिषदेच्या २ लाख ७० हजार विद्यार्थ्यांपर्यंत संगणक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या सोबत सहकार्य करार करुन प्रकल्प सुरू केला जाईल. संगणक, माहिती तंत्रज्ञान क्रांतीने मानवी कामाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पुढील जगात कल्पक व्यक्तींना रोजगार असतील. ते मिळण्यासाठी ज्ञान आणि संगणक माहिती तंत्रज्ञान आवश्यक असेल. त्या दृष्टीने विद्यार्थी- शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम अतिशय दिशादर्शक आहे.
या विजेत्या शिक्षकांनी भावी काळातील शिक्षणाचे चित्रच उभे केले आहे. फक्त शैक्षणिक साधनांची निर्मिती करून भागणार नाही, त्याचा विद्याथ्र्यांनी किती उपयोग केला, याचा शोध घेतला पाहिजे. ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जी प्रेरणा निर्माण झाली आहे, त्याबद्दल सर्व कार्यरत गुरुजींना धन्यवाद दिले पाहिजे.
*ग्रामीण शाळांना सक्षम करणे आवश्यक*
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी.ए. इनामदार म्हणाले, ‘ ग्रामीण भागाला, तेथील विद्यार्थ्यांना , जिल्हा परिषद शाळा सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताला जगात सर्वश्रेष्ठ करता येणे शक्य आहे. नव्या पिढीला सर्व प्रकारचे कौशल्य देण्याचा प्रयत्न आम्ही शिक्षण क्षेत्रात करीत आहोत. कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहिले पाहिजे.आयसीटी ला आपण स्पोकन इंग्लिश ची जोड देणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील गुरुजींच्या योगदानाचा गौरव होत राहिला पाहिजे ‘.