शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील रामेश्वर चौकाजवळ एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुणे शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. शेखर शिंदे (वय. २७) असे पीडित तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवार (दि. २७) सायंकाळी ७.३५ च्या सुमारास रामेश्वर चौकात घडली. तसेच बाळकृष्ण विष्णू गजूळ (वय. २४, रा. नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे हा मंगळवारी सायंकाळी ७.३५ च्या सुमारास रामेश्वर चौकातून दुचाकीवरून जात असताना, सुमारे सात जणांच्या टोळक्याने त्याला अडवले आणि त्यातील एकाने शिंदे यांच्यावर गोळीबार केला. या टोळक्यातील इतरांनी शिंदे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि या घटनेत शिंदे जखमी झाला.
फरासखाना पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी कि, या वर्षी २६ जुलै रोजी नाना पेठेतील अक्षय वऱ्हाळ याच्या खून प्रकरणात शिंदेचा भाऊ किशोर शिंदे हा आरोपी असल्याचे तपासात उघड झाले. या हत्येचा बदला घेण्यासाठी वल्हाळच्या मित्रांनी शेखरला ठार मारण्याची योजना आखली आणि त्यांनी मंगळवारी त्याच्यावर हल्ला केला. आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.