शबनम न्युज | पिंपरी
शांतिदूत परिवार आणि एल. ओ. सी. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील विजय जगताप यांना ‘शांतिदूत सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या २६ तारखेला प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सदाशिव पेठ पुणे येथील एलओसी रूग्णालयाच्या प्रेक्षागृहात सकाळी अकरा वाजता हा सोहळा होत आहे.यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ विठ्ठल जाधव व डॉ शशांक शहा यांनी आज दिली.
विजय जगताप यांनी अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी उभारलेल्या सहारा वृध्दाश्रमात रस्त्यावर सापडलेल्या १४ जणांचे वास्तव्य असून त्यांचे संगोपन येथे केले जाते. मावळ तालुक्यातील कुसवली या गावात हा आश्रम आहे.
दरम्यान, शांतिदूत परिवारा तर्फे दरवर्षी राज्यभर होत असलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये हजारो रक्तपेशव्यांचे संकलन केले जाते. यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले दिव्यांग विद्यार्थी रक्तदान करणार आहेत. मागील वर्षी भिक्षेकरूंनी रक्तदान केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभाग आयुक्त अभिनय कुंभार, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, शाम देशपांडे (अप्पर विभागीय आयुक्त पुणे.( से. नि.) प्रसिद्ध लेखक, उद्योजक शरद तांदळे उपस्थित असणार असल्याचे डॉ विठ्ठल जाधव यांनी सांगितले.