शबनम न्यूज : पुणे (दि.२५ जानेवारी) :- नव्या तंत्रज्ञानामुळे निवडणुका घेणे आणि नियोजन करणे सुलभ झाले असून मतदार नोंदणीवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ.सुनील शेळके व जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, वोटर हेल्पलाईन ॲप, पीडब्ल्युडी ॲप व एनव्हीएसपी या संकेतस्थळाच्या सारख्या सुविधेच्या माध्यमातून मतदार नोंदणी प्रक्रीया सुलभ करण्यात आली आहे. तंत्रज्ञानामुळे निवडणुक प्रक्रीयेवर लक्ष देणे सुविधाजनक झाले आहे. गेल्या ७० वर्षात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जगातील निवडणूकीची चांगली यंत्रणा उभी राहिली आहे. इतर देशातील निवडणूक यंत्रणेशी संबधित अधिकारी इथल्या निवडणूक सुधारणा त्यांच्या देशात करताना दिसतात.
निवडणूक प्रक्रीया अधिक चांगली करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस लोकशाही प्रगल्भ करणाऱ्या मतदाराला समर्पित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा आणि लोकशाही बळकट करावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
जिल्हा प्रशासनातर्फे सर्वसमावेशक, सुलभ व सहभागपुर्ण निवडणुकांचे उद्दिष्ट ठेऊन उपाययोजना करण्यात येत आहे. निवडणुकीतील सहभाग वाढावा यासाठी सर्व मतदारांसाठी किमान सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे हा ७ हजार ९८८ मतदान केंद्रे आणि २१ विधानसभा मतदार संघ असलेला जिल्हा असल्याने निवडणूक यंत्रणेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मतदार दिनाच्या निमित्ताने मतदार यादी अधिक अचूक आणि चांगली करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्रीमती सावंत यांनी राष्ट्रीय मतदार दिन आयोजनाची माहिती दिली. सन २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये मतदार दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यावेळी मा. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिलेला संदेश दाखविण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा राखण्याची शपथ दिली.
मतदार जागृतीसाठी उत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले, तसेच नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण व स्वीप कार्यक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट निवडणूक नायब तहसीलदार, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उत्कृष्ट पर्यवेक्षक आणि उत्कृष्ट लिपिक यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.