शबनम न्युज :प्रतिनिधी
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चा ‘यशोप्रयास’ उपक्रम
पिंपरी : जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापनात मूल्यवर्धन करणे, शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणे आणि आयआयएमएसच्या एमबीए व एमसीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे अशी दोन्ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (IIMS), यांनी ‘यशोप्रयास’ उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील मु. पो.रांजणे येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली आहे. या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय उपक्रम आयोजित करण्यासाठी आयआयएमएस चे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उत्साहाने आपला सक्रिय सहभाग नोंदवतात.
आयआयएमएस च्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी नुकतीच गुरुवारी दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. या एकदिवसीय दौऱ्यात विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार, योगासने, पाणी बचत अशा विविध विषयांवर आयआयएमएसचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी, प्रा. महेश महांकाळ यांनी आर्थिक साक्षरता आणि डॉ. सचिन मिसाळ यांनी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. शाळेला भेट दिलेल्या प्राध्यापकांमध्ये डॉ. सचिन मिसाळ, श्री. पवन शर्मा, प्रा. महेश महांकाळ, प्रा. गंगाधर डुकरे आणि डॉ. मधुरा देशपांडे आणि एमबीए प्रथम वर्ष आणि एमबीए द्वितीय वर्षाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलांसाठी वेळ आणि उपक्रम नियोजित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रा. महेश महांकाळ यांनी केले.