शबनम न्युज | पिंपरी
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) तर्फे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा आढावा घेत, या नेत्यांच्या जीवनचरित्रातून आपण प्रेरणा घेऊन आपापल्यापरीने समाजकार्यासाठी योगदान द्यायला हवे असे मत व्यक्त केले.
या दोन्ही नेत्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, अपार कष्ट, मेहनत घेऊन जिद्दीने आपले कार्य केले. त्यांच्याचमुळे आज आपल्या देशात सर्वांना विकासाची समान संधी निर्माण करणारी लोकशाही व्यवस्था तयार झाल्याचे आपण पाहतो.
विद्यार्थ्यानी आवर्जून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनचरित्रे आणि त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा वाचली पाहिजे जेणेकरून आपल्याला ध्येयाप्रती कटिबद्ध राहण्याची प्रेरणा मिळेल,असेही डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला एमबीए व एमसीए चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ.सचिन मिसाळ यांनी केले.