शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोरोना कोविड -19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मनपाची कोरोना समर्पित सर्व रुग्णालये आणि खाजगी रुग्णालये पुर्ण क्षमतेने भरलेली आहेत. येथे उपचार घेणा-या अनेक रुग्णांना ऑक्सीजन बेडची आणि व्हेंन्टीलेटरची गरज भासते. मनपाच्या वायसीएम रुग्णालयात आणि जिजामाता व नविन भोसरी रुग्णालय, ऑटो क्लस्टर रुग्णालयात उपलब्ध असणारे सर्व व्हेंन्टीलेटर कार्यान्वित असून तेथे रुग्ण उपचार घेत आहेत. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे आणखी ऑक्सीजन आणि व्हेंन्टीलेटर बेडची गरज भासत आहे. मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी आपल्या अधिकारात आवश्यक तेवढ्या व्हेंन्टीलेटरची खरेदी करावी असे पत्र स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी आयुक्तांना शुक्रवारी (दि. 9 एप्रिल) दिले आहे.
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात शनिवार (दि. 10 एप्रिल) पर्यंत एक लाख पासष्ट हजारांहून जास्त नागरीकांना कोरोना कोविड -19 ची बाधा झाली आहे. रोज बाधितांची संख्या वाढत असून शनिवारी एका दिवसात 2239 रुग्ण बाधित झाले तर, एकोनिस रुग्णांचा मृत्यू झाला. रोज वाढत जाणारा मृत्यूचा आकडा चिंताजनक असून मनपाने जर आणखी व्हेंन्टीलेटरची खरेदी केली तर यावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल व अत्यावस्थ रुग्णांचा जीव वाचविणे शक्य होईल. या दृष्टीने आयुक्तांनी ताबडतोब पिंपरी चिंचवड मनपाच्या रुग्णालयांसाठी आवश्यक तेवढ्या ऑक्सीजनच्या बेडची संख्या वाढविण्यासाठी आणि व्हेंन्टीलेटर खरेदी करण्यासाठी कार्यवाही करावी, अशीही मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केली आहे.