शबनम न्यूज / मावळ
मावळ: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी गावात असलेल्या अल्फा नगरी सोसायटीत प्रेम प्रकरणाच्या संशयातून वडिलांनी रागाच्या भरात आपल्या दोन मुलींची हत्या करत स्वतः धावत्या ट्रकखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे.
या दुर्देवी घटनेत नंदिनी भराटे (वय 18), वैष्णवी भराटे (वय 14) या दोघींचा मृत्यू झाला आहे. भरत भरटे (वय 45) असं मृत पित्याचे नाव आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शालेय अभ्यास विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यासाठीच मयत नंदिनीच्या वडिलांनी तिला मोबाईल घेऊन दिला होता.
परंतु नंदिनी ही जास्त वेळ अभ्यासा ऐवजी व्हॉट्सअॅपवर एका मुलासोबत चॅटिंग करत असल्याचे तिच्या वडिलांच्या निदर्शनास आले. त्यामुळे घरात कडाक्याचे भांडण झाले होते मोठ्या मुलीने उचललेल्या चुकीच्या पावलांमुळे समाजात नाव खराब होउन प्रतिष्ठेला बाधा पोहचू शकते या भितीने दोन्ही मुलींची हत्या करत स्वतः आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल मयत भरत भराटे यांनी उचलले असल्याची माहिती मयत भरत यांच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तळेगाव एमआय डी सी पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे