शबनम न्यूज / पिंपरी
शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शहरातील नागरिकांचे कोवीड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी महापालिका यंत्रणा काम करीत आहे. लसींच्या पुरवठ्यानुसार शहरातील लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात येत आहेत. या व्यवस्थापनाचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे असून त्यांची महापालिकेप्रती असलेली विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काम करावे अशी सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना केली.
कोवीड-१९ लसीकरण अंतर्गत लसीकरण टास्क फोर्स समितीची बैठक आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, शहर लसीकरण अधिकारी डॉ. वर्षा डांगे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. खाडे, राष्ट्रीय शहरी आरोग्य व्यवस्थापनाचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चैताली इंगळे, महापालिका रुग्णालयांच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे, डॉ. मेधा खरात, डॉ. शैलजा भावसार, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. तृप्ती सांगळे, डॉ. सुनिता इंजिनिअर आदी उपस्थित होते.
वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी कोविड लसीकरण केंद्रामध्ये वाढ करणे, कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आणि तपासणी अहवालानुसार मान्यता देणेस हरकत नसलेल्या केंद्रांना लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देणे, महापालिका कार्यक्षेत्राबाहेरील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना महापालिका कार्यक्षेत्रातील औद्योगिक संस्थांमध्ये लसीकरणासाठी परवानगी देणे आदी विषय बैठकीच्या विषयपत्रिकेवर होते. या बैठकीत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी उपस्थित अधिका-यांना विविध सूचना केल्या.
लसपुरवठा नियमित आणि सुरळीत झाल्यानंतर भौगोलिक संरचनेनुसार शहरातील तीनही विधानसभा मतदार संघ आणि प्रशासकीय क्षेत्रीय कार्यालयांचा कार्यक्षेत्रांचा समतोल राखत लसीकरण केंद्र सुरु करा असे निर्देश महापौर ढोरे यांनी प्रशासनाला दिले. त्या म्हणाल्या, लसीकरणासाठी येणा-या नागरिकांना योग्य आणि समाधानकारक माहिती दिली पाहिजे. सध्या लसींची कमतरता आहे याबाबत सर्व नागरिकांना माहिती आहे. लसीकरणासाठी येणारे नागरिक आणि उपलब्ध लस साठा यांची सांगड घालून लसीकरण राहिलेल्या नागरिकांना योग्य माहिती द्यावी. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. केंद्रामध्ये लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असेही महापौर ढोरे म्हणाल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विविध हेल्पलाईनची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. रुग्णालयांना सुरळीत व नियमित ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. शहरातील नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करत आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे आवश्यक असून सर्वांच्या हितासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी केले.