शबनम न्युज / पिंपरी
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर आकारण्यात येणा-या वैद्यकीय बिलांचे शासन निर्णयानुसार पुर्वलेखापरिक्षण केले जाणार आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत खाजगी रुग्णालयांनी दक्षता घेण्यात यावी अशी सुचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केली.
कोविड-१९ अंतर्गत राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसुचनेनुसार खाजगी रुग्णालयांनी वैद्यकीय बीलांची आकारणी करण्याबाबत तसेच महापालिकेने नेमलेल्या लेखापरिक्षण पथकाबरोबर समन्वय ठेवण्यासाठी आज शहरातील कोविड-१९ उपचार करणा-या खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टर तथा संचालकांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. सुजाता साळवे, बील पडताळणी समिती प्रमुख तथा सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीमध्ये अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले आहे. अनेकांना मानसिक, शारीरिक त्रास सोसावा लागला. अशा वेळी मानवी संवेदना जागृत ठेवून प्रत्येकाने सेवा दिली पाहिजे, असे नमुद करुन आयुक्त पाटील म्हणाले, लोकभावना समजून घेण्याची नितांत गरज आहे. रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना बीलाकरीता अडवणूक करणे योग्य नाही. कोरोना रुग्णांवरील उपचारांचे दर शासनाने निश्चित करुन दिले आहेत. यादराप्रमाणे रुग्णालयाने आकारणी करुन बील दिले पाहिजे. बीलाबाबत वाढणा-या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी बीलांचे प्री ऑडीट करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित रुग्णालयाने वेळेत बील तयार करावे, ते एकत्रित बील असावे. योग्य कारणासाठी रुग्णालयांना आवश्यक असल्यास महापालिकेचे सहकार्य असेल. महापालिका प्रशासनाला लेखापरिक्षणाबाबत रुग्णालयाने सहकार्य करावे असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, नियमांचे उल्लंघन कोणीही करु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल. वैद्यकीय सेवेला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा सहभाग महत्वाचा असतो. मात्र अवाजवी बीलांसारख्या तक्रारी उद्भवू नयेत याची दक्षता रुग्णालयांनी घ्यावी.
यावेळी मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, बील पडताळणी समिती प्रमुख श्रीकांत सवणे यांनी बीलांचे प्री ऑडीटबाबत उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.