कल्याण : एका चहामुळे अनेक टेन्शन दूर होतात असे म्हटले जाते. मित्रांसोबत गप्पा मारताना हा चहा एक उत्तम साथीदार होतो. मात्र याच चहामुळे दोन मित्रांचे प्राणही वाचले जाऊ शकतात यावर कोणी विश्वास ठेवेल का…? पण खरंच असं घडलं आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर एका कारवर दरड कोसळली. माळशेज घाटात पोहोचल्यावर कारमधील दोघांना चहाची पिण्याची इच्छा झाली होती. कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली.
मुसळधार पावसात माळशेज घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. माळशेज घाट परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.
त्यातच दरड कोसळून दुर्घटना घडली, परंतु सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही अथवा जीवितहानी झाली नाही.
अहमदनगर इथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दोघे गाडीने माळशेज घाटात पोहोचले. यावेळी चहा पिण्याची इच्छा झाल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमधून उतरुन चहाच्या दुकानजवळ पोहोचले असतानाच अचानक त्यांच्या गाडीवर दरड कोसळली.
या दुर्घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने मुकुंद आणि त्याचा मित्र गाडीतून उतरल्याने सुखरुप बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या दोघांनाही आला.
दरम्यान गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर काम करुन दरड हटवली.
प्रतिनिधि
दिलीप सोनकांबळे