मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झालं. शेवटी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा केला आहे. तसेच भाजपाच्या आमदारांचे निलंबन केल्यानंतर विरोधा पक्षाने सभागृहातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या १२ आमदारांची नावे आहेत –
१. संजय कुटे २. आशिष शेलार ३. गिरीश महाजन ४. पराग अळवणी५. राम सातपुते ६. अतुल भातखळकर ७. जयकुमार रावल ८. हरीश पिंपळे ९. योगेश सागर १०. नारायण कुचे ११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया १२. अभिमन्यू पवार