शबनम न्यूज / पुणे
211 खडकवासला विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये फोटो नसल्यासच मतदारांनी फोटो जमा करावे, असे आवाहन हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सचिन बारवकर यांनी केले आहे.
211 खडकवासला विधानसभा मतदार संघातील ज्या मतदारांची नावे मतदार यादीत आहेत परंतु फोटो नाहीत. अशा मतदारांनी आपले फोटो निवडणूक शाखा तहसिल कार्यालय हवेली पुणे खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ, पुणे -2 येथे किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे आठ दिवसांच्या आत जमा करावेत. मतदार यादीत फोटो नसल्यास अशा मतदारांनी एक फोटो तसेच ओळखपत्र व रहिवाशी पुरावा यांची छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी रंगीत फोटो देण्यात यावेत याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे फक्त मतदार यादीमध्ये फोटो नसल्यासच मतदारांनी फोटो जमा करावेत.
मतदार यादीत फोटो नसणे, माहिती पुर्ण नसणे तसेच पत्ता अद्यावत नसणे इत्यादीबाबत नमुना क्र. 8 भरून कागदपत्रे कार्यालयात जमा करावेत अथवा www.nvsp.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नमुना नं. 8 भरावेत. तसेच स्थलांतर झालेले, दुबार, मयत, मतदारांची नावे वगळण्याकामी नमुना नं. 7 चा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
ज्या मतदारांचे फोटो आठ दिवसात जमा होणार नाहीत अथवा www.nvsp.in यावर ऑनलाईन अर्ज नमुना 8 मध्ये प्राप्त होणार नाहीत अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणेबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करणेत येईल. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नावे तपासून घ्यावीत. फोटो आहे किंवा नाही, याची पाहणी करावी. फोटो नसल्यास कागदपत्र सादर करावीत, असेही आवाहन हवेली प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सचिन बारवकर व तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी केले आहे.