शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनिवार्य असून शिक्षणाचा स्तर सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढवितो असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने प्रभाग क्र. २० कासारवाडी येथील श्री छत्रपती शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्या सुजाता पालांडे, स्वीकृत नगरसदस्य माऊली थोरात, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, सहाय्यक आरोग्याधिकारी रमेश भोसले, उपअभियंता धनंजय गवळी, संतोष दुर्गे, महेश देवरे, मुख्य आरोग्य निरिक्षक महेश आढाव, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे यांनी शहरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून शिक्षणाच्या विविध संधी त्यांचे करीता उपलब्ध केलेल्या आहेत असे सांगून महापालिकेच्या शाळांतील गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
कासारवाडी येथील शाळेच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर वाहनतळ आणि पाच मजले तयार करण्यात आले आहेत. शाळेत प्रत्येक मजल्यावर ७ ते ८ वर्गखोल्या, स्टाफरुम, कार्यालय असून सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, संगणक कक्ष आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. शाळेसाठी ८ व्यक्ती क्षमतेची लिफ्टची सोय करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यासाठी १५५० चौरस मीटरचे खेळाचे मैदान बनविण्यात आले आहे.
या शाळेचे क्षेत्रफळ ४५६७ चौरस मीटर असून शाळेच्या बांधकामासाठी सुमारे १३ कोटी ७१ लाख इतका खर्च आलेला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार माऊली थोरात यांनी मानले.