शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (NFITU) राष्ट्रीय कार्यकारिणी व उपाध्यक्ष पदावर कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांची निवड करण्यात आली.
NFITU चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक जयस्वाल यांनी या निवडी बाबत ची घोषणा नवी दिल्ली येथे केली आहे. NFITU ही केंद्र शासनमान्य संघटना आहे. या संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे देशातील असंघटित, संघटित अशा 50 कोटीच्यावर असलेल्या कामगारांच्या प्रश्नांकरिता संसदेच्या श्रम मंत्रालय निगडित कामगार कायदे पुनर्गठन समिती देशभरात असलेल्या अडतीस कोटी असंघटित कामगारांसाठी काम करणारी वेतन समिती, देशभरातील संघटित, असंघटित कामगारांसाठी आर्थिक तरतूद करणारी व कामगार हितासाठी विविध उपक्रम राबविणारी संसदीय स्थायी समिती (कामगार),कामगारांसाठी देशभरात विविध कल्याणकारी काम करणारे विविध बोर्ड या सर्व ठिकाणी या संघटनेच्या वतीने प्रतिनिधी या नात्याने काम पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कामगार संघटनेतही भारतीय श्रमिकांच्या भूमिका मांडण्याची संधी प्राप्त होणार आहे.
केंद्र शासनाने देशातील केवळ 14 कामगार संघटनांना मान्यता दिली असून, त्यापैकी एक महत्त्वपूर्ण संघटना आहे. संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी यशवंत भोसले यांची निवड झाल्यानंतर या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक जयस्वाल यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव, राज्यातील सर्व मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कामगार मंत्री तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची डायरेक्टर यांना पत्र पाठवून कळविले असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यास कळविण्यात आले आहे. अशी माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.