शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या “उमेद जागर” उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून महापौर माई उर्फ उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी महिलांशी संवाद साधला.
कोरोनामुळे पतीचे निधन झाल़्याने वैधव्य आलेल्या महिलांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने उमेद जागर हा उपक्रम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे द्वितीय सत्र मंगळवारी (दि. 31) चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला महापौर माई उर्फ उषा ढोरे ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नागरवस्ती विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, दुःख मोठे आहे. मात्र ते कवटाळून बसून कधीच उन्नती होणार नाही. त्यामुळे आता उमेद निर्माण करायची आहे. यासाठी पालिकेने अत्यंत कौतुकास्पद असा उमेद जागर हा उपक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम इतर राज्यांना देखील आदर्शवत ठरणार आहे. त्यामुळे महिलांनी आता स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्याला आणि कुटुंबाला सावरायचे आहे. महापालिका देत असलेली 25 हजारांची आर्थिक मदत ही केवळ पैसे म्हणून न पाहता ते आपल्याला दिलेले एक पाठबळ आहे ते भांडवल म्हणून गुंतवायचे आहे. यातून आपली पुढची दिशा ठरवायची आहे. असाही सल्ला महापौर ढोरे यांनी उपस्थित महिलांना दिला. याशिवाय कोविडमुळे ज्यांच्या घरातील “कर्ते” निघून गेले.अशा महिलांना त्यांची राहती घरे स्वतःच्या मालकीची करून देण्यासाठी माफक शुल्क आकारावे अशी सूचना देखील यावेळी महापौरांनी प्रशासनाला केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोना महामारीचे संकट मोठे आहे. घरातील माणूस गेल्याचे दुःख तर आहेच. सोबत आर्थिक विवंचना, भविष्याची शाश्वती यांसारखे अनेक प्रश्न समोर उभे आहेत. मात्र आता खचून चालणार नाही. स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला चांगले जीवन जगता येईल यासाठी “उमेद” न हारता उभे रहावे लागणार आहे. ही उमेद पिंपरी-चिंचवड महापालिकेने तुम्हाला दिली आहे. याचा व्यवस्थित उपयोग करून स्वावलंबी व्हा, सन्मानाने जीवन जगा असा सल्ला यांनी दिला.
“उमेद जागर” या उपक्रमांमधून महिलांना सरकारी योजना सहाय्य, स्वयंरोजगार, रोजगार आणि समुपदेशन केले जाणार आहे. हा उपक्रम आणि त्याचा पाठपुरावा पुढील वर्षभर महापालिका
करणार आहे असे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट करत ते महिलांशी संवाद साधताना म्हणाले, उमेद जागर या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी अनेक उपक्रम अंतर्भूत केले आहे. उमेद जागर हा कार्यक्रम महिलांना पाठबळ देण्यासाठी राबविण्यात येत आहे .महिलांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःला आणि कुटुंबाला सावरावे हा पालिकेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत.
आयुक्त पाटील पुढे म्हणाले कोरोना महामारी हे संकट मोठे होते.यातून अनेक समस्या, अनेकांसमोर उभ्या राहिल्या. अनेकांच्या घरातील हक्काची माणसे निघून गेली.हे दुःख मोठे आहे.यातून पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आर्थिक विवंचना, भविष्याची शाश्वती यांसारखे अनेक प्रश्न आहेत. मात्र केवळ याचा विचार करून जगणे अशक्य आहे. केवळ सांत्वना करून चालणार नाही. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागणार आहेत. त्यामुळे दुःख बाजूला ठेवा, भविष्यात काय करता येईल याचा विचार करा. आपल्या घरातील पुढच्या पिढीसाठी आपल्याला खंबीर व्हावे लागणार आहे.त्यासाठी उमेद जागर हा उपक्रम आपल्या पाठीशी उभा राहिला आहे असा विचार करा.
उपायुक्त अजय चारठाणकर म्हणाले, न भूतो न भविष्यती असे संकट आपल्यावर कोसळले आहे. आता त्यावर जास्त विचार करण्यापेक्षा हे आव्हान स्वीकारणे गरजेचे झाले आहे. आपल्या माता-भगिनी यांच्यावर जे संकट आले. त्या संकटातून त्यांना सावरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका उमेद जागर या उपक्रमातून रोजगार, स्वयंरोजगार ,प्रशिक्षण बँकांकडून अर्थसहाय्य यांसारखी मदत देणार आहे. सोबतच नागरवस्ती विभागाच्या माध्यमातून 25 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील देणार आहे.
पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर आहे. या शहरातील अनेक कंपन्यांमध्ये सीएसआर फंडातून मदत किंवा महिलांना रोजगार देखील या उपक्रमातून मिळणार आहे. याशिवाय महिलांची जशी मागणी असेल त्याप्रमाणे मदत पुरवली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समूह संघटक प्रत्येक ‘अपडेट’ फोनद्वारे थेटपणे महिलांना देणार आहे. त्यामुळे कोणतीही अडचण उद्भवणार नाही. याशिवाय काही महिलांच्या बाबतीत घर नोंदणी, मुलांचे शिक्षण यासारख्या कौटुंबिक समस्या देखील मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. त्यांचे निराकरण करणे देखील महापालिका प्राधान्याने हाती घेणार आहे. उमेद जागर हा कार्यक्रम एक छोटी पाउलवाट आहे की महिलांना आत्मनिर्भरतेच्या राजमार्गावर घेऊन जाणार आहे असेही चारठाणकर म्हणाले.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी महिलांना उमेद जागर उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास बहाद्दरपुरे यांनी केले.