शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
एटीएम बसविण्याच्या बहाण्याने 70 ते 80 जणांची सात ते आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. आदित्य शगुन मॉल बावधान पुणे येथे फेब्रुवारी 2020 पासून ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
परमेश्वर दादाराव पाटील (वय 45 रा. अहमदनगर) यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. 4) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर राजू भीमराव साळवे (वय 41)त्याची पत्नी ज्योती राजू साळवे (वय 34 दोघेही रा. वारजे माळवाडी पुणे) मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे (रा. बावधान बुद्रुक पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परमेश्वर दादाराव पाटील यांच्यासह इतर 70 ते 80 जणांचा आरोपींनी विश्वास संपादन केला. एटीएम बसविण्याचे सांगून त्यातून मोबदला मिळेल असा बहाणा करून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी आरोपींनी अनामत रक्कम म्हणून गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी सुमारे दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर काही गुंतवणूकदारांना स्थळ पाहणी करून एटीएम बसविण्याच्या जागा दाखवून त्यासाठी संबंधित जागा मालकांशी जागेचा भाडेकरार देखील करण्यास सांगितले. त्यासाठी अनामत रक्कम जागेचे भाडे, विज बिल आदी खर्च देखील गुंतवणूकदारांनी केला. मात्र तरीही आरोपींनी एटीएम बसविले नाही.
दरम्यान, गुंतवणूकदारांनी एटीएमच्या संपादित कंपनीकडे चौकशी केली, आम्ही अशा पद्धतीने कोणत्याही कंपनीला एटीएम बसविण्याचे काम दिलेले नाही असे संबंधित एटीएमच्या कंपनीने स्पष्ट केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला त्यानंतर गुन्हा दाखल झाला.