पिंपरी, दि. १७ सप्टेंबर २०२१ :- शहराच्या जडणघडणीत महिलांचे योगदान व्यापक असून शहर विकासात महिलांचा समावेश करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना पत्र देऊन आगामी अर्थसंकल्पात महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण याकरीता तसेच तृतीयपंथीय व्यक्तींकरीता महानगरपालिकेच्या बजेटमध्ये त्यांच्याकरीता स्वतंत्र भरीव आर्थिक तरतूद बाबतीत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
महापौर माई ढोरे यांनी दिलेल्या पत्रात महिलांकरीता राबवायच्या विविध, विकास योजना, विकास कामांचा नियोजनबध्द आणि अचूक अंदाज घेऊन जेंडर बजेटमध्ये स्वतंत्ररित्या आर्थिक तरतूद करण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील महिलांच्या सक्षमीकरणास, सबलीकरणास तसेच तृतीयपंथीयांच्या विकासास गती मिळेल याकरीता कार्यवाही करणेबाबत त्यांनी नुकतेच आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.