- नगरसेविका नम्रता लोढे यांची मागणी
- सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी परिसरात वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी प्रमुख चौकांमध्ये सिग्नल उभारण्यात आले आहेत. परंतु, प्रमुख चौकांमधील सिग्नलजवळ थांबताना वाहनचालकांची धांदल उडत आहे. कारण, चौकांमधील झेब्रा क्रॉसिंग गायब झाले आहेत. त्यामुळे मुख्य चौकांमध्ये पांढरे पट्टे व रिफ्लेक्टर बसवण्यात यावेत, अशी मागणी भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले यांना मागणीचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी परिसरातील एमआयडीसी चौक, लांडेवाडी प्रवेशद्वार, इंद्रायणी कॉर्नर, धावडेवस्ती चौक आदी प्रमुख चौकांमध्ये सिग्नल उभारण्यात आले आहेत. त्याचा फायदा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी होत आहे. पण, पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अडचण निर्माण होत आहे. तसेच, सिग्नल लागल्यास वाहने कुठे थांबवावी? असा संभ्रम वाहनचालकांना होताना दिसतो.
परिणामी, वाहतूक पोलीस प्रशासनाने भोसरी आणि परिसरातील मुख्य चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगसाठीचे पट्टे, स्टॉपलाईन आखण्याचा उपक्रम हाती घ्यावा. नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी तसेच वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सिग्नल असलेल्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका लोंढे यांनी केली आहे.