शबनम न्यूज | पुणे
पीएमपीएमएलची पुणे दर्शन व रातराणी बससेवा दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ पासून पुन्हा सुरु होत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २२ मार्च २०२० पासून पुणे दर्शन व रातराणी बससेवा बंद करण्यात आली होती.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रवाशी व नागरिकांच्या सोईसाठी सर्व रातराणी बसमार्ग व पुणे दर्शन बससेवा सुरु करणेबाबत आदेशित केले आहे.
पुणे दर्शन बससेवा पूर्वीप्रमाणेच एसी बसद्वारे पुरविली जाणार आहे. पुणे दर्शन बससेवेंतर्गत केसरीवाडा, शनिवारवाडा, केळकर संग्रहालय, चतुश्रुंगी माता मंदिर, आंबेडकर वस्तुसंग्रहालय, पु.ल.देशपांडे गार्डन, सारसबाग गणपती, कात्रज सर्पोद्यान, शिंदेछत्री वानवडी, युद्धभूमी (घोरपडीगाव कॉर्नर), आदिवासी वस्तू संग्रहालय, आगाखान पॅलेस या प्रेक्षणीय स्थळांची प्रवाशी नागरिक व पर्यटकांना सफर करता येणार आहे. पुणे दर्शन बससेवेसाठी फक्त ५०० रूपये तिकीट आहे.
पीएमपीएमएलच्या डेक्कन व पुणे स्टेशन मोलेदिना येथील पासकेंद्रांवर पुणे दर्शन बसचे तिकीट बुक करता येईल. तसेच
www.pmpml.org या वेबसाईट वरून देखील online बुकिंग करता येईल. पुणे दर्शन बस सकाळी ८.४५ वा. पुणे स्टेशन व डेक्कन वरून सुटेल व सायंकाळी ५.३० वा. परत पुणे स्टेशन व डेक्कन या ठिकाणी प्रवाशी व पर्यटकांना पोहोच करेल.
पीएमपीएमएलची रातराणी बससेवा देखील दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ पासून पूर्ववत सुरु होत आहे. कात्रज, पुणे स्टेशन, हडपसर, निगडी व भोसरी डेपोतून विविध मार्गांवर प्रवाशी नागरिकांच्या सोयीसाठी रातराणी बससेवा पुन्हा सुरु होत आहे.