शिक्षकांचे रखडलेले व कपात केलेली पगाराची रक्कम जमा करा!
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
कोरोनाच्या काळात अध्ययन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रखडलेले व कपात केलेली पगाराची रक्कम परत मिळवुन देण्यासाठी आता चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस पुढे सरसावली आहे.
युवक कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने थेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेवुन शिक्षकांचे रखडलेले तसेच कपात केलेले पगाराची रक्कम त्यांना मिळवुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, प्रवक्ते गौरव चौधरी, बेंजामिन काकडे, तुषार पाटील, रेव्ह डॉ. एम. डी. बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाले आणि अनेकांचे रोजगार गेले. हातावर पोट असलेल्या अनेक कामगार तसेच मजुरांनी उपासमार टाळण्यासाठी घरचा रस्ता धरला. हजारो मैल पायी प्रवास करुन ते आपल्या मुळ गावी परतले. तर अनेकांची जीवन यात्रा रस्त्यात प्रवास दरम्यान संपुष्टात आली.
शाळा तसेच महाविद्यालय देखील बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागत झाले.
परंतु, ऑनलाईन शिक्षण पद्धत सर्वांसाठी नवीन असल्याने पालकांसह शिक्षकांसमोर एक प्रकारे आव्हान उभे राहिले. अशा बिकट परिस्थितीला न डगमगता शिक्षक खंबीरपणे सामोरे गेले. सर्वांनी एकजुटीने हे आव्हान एखाद्या योद्ध्याप्रमाणे समर्थपणे पेलले. शिक्षणात खंड पडु दिला नाही. दरम्यानच्या काळात मात्र, खासगी शिक्षण संस्था चालकांची शिक्षकांप्रती मुजोरगिरी समोर आली.
खासगी शिक्षण संस्था चालकांनी शिक्षकांचे पगार रोखुन धरले. तर काही शिक्षण संस्था चालकांनी शिक्षकांच्या पगारात कपात केली. अर्धा – अर्धा पगार शिक्षकांच्या हातावर ठेवला.
हातात पडलेल्या तुटपुंज्या पगाराच्या रकमेत शिक्षकांनी कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबाची घडी संभाळली. अध्ययन करण्याचे पवित्र कार्य सुरुच ठेवले.
सध्या कोरोनाचे संकट कमी झाले आहे. सर्व ठिकाणी सरकारने लागु केलेले निर्बंध शिथिल केले आहे. कोरोना नियमावलीचे तंतोतत पालन करुन पन्नास टक्के का होईना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सर्व शाळा, महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे.
शाळा सुरु झाल्या..मात्र शिक्षकांचे रखडलेले पगार आणि कपात केलेली पगाराची रक्कम देण्याबाबत संस्था चालक तोंडातुन चकार शब्द काढत नाहीत.
शिक्षकांना त्यांच्या पगाराची रक्कम परत मिळावी. याकरिता चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसने पुढाकार घेतला आहे. लवकरच शालेय शिक्षण मंत्री यांनी याबाबत अध्यादेश काढावा. अशी मागणी चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.